जरि प्रेम असेल भले अपुले

(चाल: आशक मस्त फकीर ह॒आ...)

जरि प्रेम असेल भले अपुले,
तरि खात कुणा-घरि राहू नको Ilधृll

नित कष्ट करी,धरि धैर्य मनी,
नच लाज कुणाची ठेव जनी l
कवडीहि मिळे बहुमोल तिचे,
धनिका झुरुनी कधि पाहु  नको ll1ll

गणगोत असो वा मित्र असो,
जनलोक असो वा पुत्र असो l
कुणि दृष्ठ क्रिया करतील जगी
मदतीस तयांच्या जाऊ नको ll2ll

कुणी दीन भिकारी द्वारि उभे,
खाण्यात तयाची जा किव घे l
तुकडया म्हणे ऐक गडया!इतुके,
प्रभुला विसरोनी जाऊ नको ll3ll