ऐकता स्वस्थ तरि काय
(चाल : राजहंस माझा निजला..)
ऐकता स्वस्थ तरि काय, नाहि का हृदय तुम्हाला ?।।धृo॥
म्हणविता मराठे आम्ही, शिवछत्रपती- वंशाला ।
पाहिला मार्ग का त्यांचा, वाचले काय चरिताला ?
(अंतरा) परधर्म भयानक होता ।
मावळा कडकड़े चित्ता ।
सोडुनी घराची सत्ता ।
धावुनी मिळति शिवबाला, राखण्या धर्म हा अपुला ।।१।।
गर्जती मराठे सगळे शिव हर हर निर्मळ वाणी ।
घेउनी कट्यारी हाती, पाहती शत्रुचे पाणी ।
प्राणापरि जपती आज्ञा, करुनिया संघ निर्वाणी ।
फोडती हाक जोरांची ।
धडधडे छाति चोरांची ।
अति वीर थोरथोरांची ।
तो काळ पुण्यमय गेला, राखण्या धर्म हा अपुला ।।२।।
गुरु रामदास लाभावे, भाग्याने त्या समयासी ।
सत्या -मंत्र देउनि लोकां, सोसवी कष्ट सायासी ।
जागजागि धावुनि गेले, उठविण्या वीर तरुणांसी।
प्रार्थुनी प्रभू रामासी ।
आशीर्वच दे शिवबासी ।
ताराया दीन जनांसी ।
भगवा ध्वज विजयी केला, राखण्या धर्म हा अपुला ॥३॥
दुर्दैवे अमुच्या आता, ती वेळ जिवाशी आली ।
बोलही निघेना तोंडी, येउनी उराशी बसली ।
या उठा, उठा हो ! सगळे,धर्माची इभ्रत गेली ।
तुकड्याची ऐका हाक ।
सोडा दुसय्रांचा धाक ।
व्हा रणी, पथी नि:शंक ।
वडिलांचि लाज धरण्याला, राखण्या धर्म हा अपुला ।।४।।