सफल करा ही आस, प्रभू हा मागतसे मनुजाला
(चालः तुमबिन मोरी कौन..)
सफल करा ही आस, प्रभू हा मागतसे मनुजाला ।
मर्त्य तनूतुनि अमृत द्या मज विनवि सकल लोकाला ।।धृ०।।
प्रीय असा हा मानव योध्दा, जागतसो कर्माला ।
असतातुनि दे सत्य मंथुनी, मानिन धन्य तयाला ।।१।।
धर्म-कर्म हे सहजचि घडती, आलीया जन्माला ।
कीर्ति-ध्वजा ही मिळवूनि द्या मज, मानस शांतविण्याला ॥२॥
पुष्प जणू गंधाने सुखवी, कमळ अलिप्तपणाला ।
सुखवी कोकिळ मधुरावाजे, मानव तेवि यशाला ।।३।।
दुर्बल हा मनु दिधला देवे, पाप, पुण्य करण्याला ।
स्वतंत्रता ही ओतुनि अंतरि, खेळिचि खेळि तुम्हाला ।।४।।
तुकड्यादास म्हणे शुर मनुजा ? भवसागरि जरि पडला ।
ऊठ उभा हो, सद्बुध्दी धर, त्यागुनि विषय-सुखाला ।।५।।