तव अंतरि वाटते - बहू मज, मित्र अता झाले
(चाल : कसा निभवशी काळ..)
तव अंतरि वाटते - बहू मज, मित्र अता झाले ।
जाण सख्या ! हे धन-लोभी, साधती स्वार्थ अपुले ।।धृ० ।।
स्त्री-पुत्रादिक, विहिण - जावई, लावुनिया प्रेम ।
अवतरले तव घरी स्मराया - कधि भेटेल दाम ? ।।१॥
तवघरचे बघ मात-पितादिक, जमले स्वहिताला ।
अंति न कोणी येइ गड्या रे ! मूर्ख कसा बनला ? ।।२।।
शेवटि रडशिल साह्य कराया, मज कोणी नाही ।
नच कोणी हे पाहि गड्या रे ! तू कवणे ठायी ? ॥३॥
स्वार्थिच हे जग, अंतरि या ढग, साफ नसे आत ।
सांगतसे तुज तुकड्या तो गुज, भज श्रीगुरुनाथ ॥४॥