होई निर्भय, अपुले निजस्थानी
(चालः अरे हरि प्यालो.)
होई निर्भय, अपुले निजस्थानी ।
सोडि मायिकावरी पाणी ॥धृ०।।
पाच विषयांच्या,स्वाधिन नच तूही, भिवोनी लपला मृगडोही ।
शब्द-स्पर्शाच्या, वाहतो का मोही ? तुझे पासुनिया सगळेही ।
जाहले उभे, शोधी लवलाही, विवेका जोड़ूनिया पाही ।
लीन राहती, ठेवि आवरोनी ।।0 ।।१॥
विकारहि सहा, कोठुनिया आले ? भोगिती कोण ययासि भले ?
कसे स्वाधीन, त्याचे तुम्हि झाले ? मुलासी बाप म्हणो आले ।
काय नवल हे ! ओढा मन अपुले, गाजवा मालकिचे टोले ।
करा मुखत्यारी, मुरवुनि मन स्थानी ।। सोडि0 ।।२।।
त्रिगुण गाजवी, तुजवर अधिकार, बनविले मालक त्या थोर ।
कसा कुविचारी, होशी अनिवार, सत्वगुण करि रे ! सामोर ।
गाळुनि दोन करी कारभार, काढि निज-पुण्याचा सार ।
शुध्द स्वरुपात रंगवि चित्त-वाणी ।। सोडि0।।३।।
पुण्य-पापासी लावुनिया घेशी, देह-अभिमाने गति ऐसी ।
लागली तुज, कैसा भुललासी ? निरामय तूचि अविनाशी ।
आप अपुला, खेळ भ्रमे बघशी,म्हणुनिया जाशि स्वये फासी ।
समज धर गङ्या ! तुकड्या गुरु-चरणी ।। सोडि0।।४ ।।