श्री सद्गुरु आडकुजी समर्था ! किती आळवू तुला

(चाल: धन्य धन्य मे ्फूर्ति ब्मये.. )
श्री सद्गुरु आडकुजी समर्था ! किती आळवू तुला ? ।
प्राण सद्गदित कठि जाहला ॥धृ०॥
कर्महीन मी पुरा अभागी काय वर्णु श्रीगुरु ! ।
धीर तव नामस्मरणी धरु ।।
कूळ-गोत धन-मान सोडुनी, चरण- धरणि पातलो ।
सदन नच, वदनरुपी ओतलो ॥
(अंतरा) त्यागिले भान तव कृपे अशाश्वत हिचे ।
तव पुढे दिसे मुल शमदमसाधन किचे ।
अजि ! भक्तकामकल्पद्रम गुण स्वामिचे ।
वेद श्रृति वाजवी नौबदा, ना कळशी तू भला ।
प्राण सद्गदित कंठि जाहला ।।१॥
गाता तव महिमान पुरेना, जन्म नराचा खरा ।
अल्पमति गाती तुज सुरवस ! ।।
अठरा शतकी, विशंति साली, जन्म पावला भला ।
प्रगटली निजप्रेमाची कला ।
जन्म कसारागृही घेउनी, बाळपणी वाढला । 
चरित्रे विचित्र  दावी भला ॥
(अंतरा) वरुषात पाचवे आई मृत्यु पावली ।
वय सानपणाची कष्टरुपी भोगिली ।
गणगोतशोकमोहातुनि तनु काढिली ।
मोह त्यागुनी फिरे भूवरी, रामरुपी राहिला ।
प्राण सद्गदित कंठि जाहला ।।२।।
जन्मजात संस्कारि पूर्ण प्राक्तनी पुरे - पातले ।
न काही शिके कुणी शिकविले ।।
वय अठराचेमधी, लग्न होउनी, नग़्न जाहले ।
ही ग्वाही देति पुरातन भले ।।
मौनरुप सर्वदा राहणी, शांतरुपी ओतली ।
नखशिखी रंगसुरंगी भली ।।
(अंतरा) घरदार सर्व नाराज तयाचे वरी ।
कुणि बरे पाहिना, नग्नरुपे वावरी ।
एक ईश्वर-स्मरणी, माला वदनी धरी ।
श्रीसद्गुरु मायबाई - करुणाप्रसाद, मग लाभला ।।
प्राण सद्गदित कंठि जाहला ।।३।।
आधि सूक्ष्म मग प्रगट ज्योति, लखलखाट नयनावरी ।
मस्त अलमस्त जगी वावरी ।।
वय चाळिस वरुषात, वरदहस्तात मग्न होउनी ।
त्यागिले प्रेम, फिरे वनवनी ।।
मानपान सोडिला, कडक वैराग्य धरुनिया मनी ।
न मागे हाति छदामी कणी ॥
(अंतरा) सुख मनी, खांदि घोंगडी, शिकाळी करी ।
नच स्थान नेमिले, कुठे पडे भूवरी ।
कुणि चरण धराया येइ, पळे दुरदुरी ।
नसे वस्त्र अंगास, विदेही चमकदार उज्जवला ।
प्राण सद्गदित कंठि जाहला ।।४।।
वृत्ति प्रखर, आरवी सोडुनी, वरखेडी पातले ।
छळीती फार मनाने मुले ।।
दंग रंग स्वरुपात असे, निजमाला घोळित बसे ।
मनाशी उल्लासे निज हसे ।।
कुणी वदा की सदा बसा, नच लहरिविना बोलती ।
फार मग शांत जाहली स्थिती ।।
(अंतरा) नवलाव ऐकुनी सत्य वचन बापुडे ।
अनुभवहि जनाला येती पुढच्या पुढे ।
करि दूर दृष्टिने भक्तकाम- साकडे ।
निसंग विहरत, विरक्त राहणी, जनजिव उत्साहला ।
प्राण सद्गदित कंठि जाहला ।।५।।
चैतन्यी प्रगटली दृष्टि फाकली, टकमकी पुरी ।
रंग तो सुवर्ण केसावरी ।
ध्वजा पद्म पाउली, कुसुम-सम कोमलपण तनुमना
पाहता हरपे मग-कामना ।।
स्वच्छंदी राहणी, निरासक्तीत वास जागृती ।
कधी नच गुंग धुंद राहती ।।
(अंतरा) तव वाटुनिया भरवसा जनाला पुरा ।
स्थापिले जनांनी वरखेडी गुरुवरा ।
बहु आनंदित होउनी गाति श्रीधरा ।
माळ-फुले वाहुनी, सद्गुरु आङकृजीपूजिला ।
प्राण सद्गतित कति जाहला ।।६।।
अजानबाहु मूर्ति मोजिरी, शांत स्वरुप भुरभुरे ।
रक्त आरक्त तेज साजिर ।
उर्ध्व दृष्टि कमलांकित शोभे, केस कुर शिरी । 
सरळ लवचीक नासिका वरी ।।
बुधवार नि शनिवार पाहुनी, स्नान सुखे घालिती ।
करीती निजभावे आरती ।।
(अंतरा) आनंदित तन्मय निर्भय जनता पुढे ।
वाजंत्रि कामसंकल्पित गाती धड़े ।
सान थोर अवधे रांग-रागि निर्भिडे ।
धन्य धन्य ती लिला तयाची, काय वर्णवे मला ?
प्राण सद्गदित कंठि जाहला ।।७।।
जात पात नच गणुनी कोणी भोजनास आणिती ।
सुखाने प्रेमताट ठेविती ।
प्रेमाने मारुनी हाक त्या भोजन करि चारिती  । 
मित्र- सन्मित्रवर्ग पाहती ।।
बाळ- सान - थोरास घेडनी, आनंदित राहती ।
मुखाने प्रेमशब्द काढिती ।।
(अंतरा) श्वानांचा जमवुनि मेळा ताटावरी ।
निर्भयी - ऐक्य पाहनी ग्रास सावरी ।
कधि सेविति नातरि दे फेकुनि बाहिरी ।
आनंदाचा दिवस तई तो, जगन्निवासा ! भला ।
प्राण सद्गदित कंठि जाहला ।।८।।
निजानंदि राहणी, सदा अलमस्त रुपी वाकरी ।
काळ आनंदे गेला वरी ।।
जनतेच्या पालका ! साकडे, वारिसि दुरच्या दुरी ।
प्रेम जे करिती हृदयांतरी ।।
वयवृद्धित झकझकाक ज्योती, प्रगटे हृदयांतरी ।
करी कामना जनाची पुरी ॥
(अंतरा) जनतेची दाटी अफाट गावामधी ।
या तरा तरा ऐसा ध्वनि उमटे कधी ।
पण चित्तशुद्धि ते साधा अधिच्या अधी ।
शतवर्षाच्या आयुष्याचे दोरी तनु ताणला ।
प्राण सद्गदित कंठि जाहला ।।९।।
मास शुद्ध कार्तीक पौर्णिमा, निजानंदि साठवी ।
वेळ ती घडिघडि मज आठवी ॥
नसे दुःखि अणि सुखी कधीही, दोन्ही सम राहती ।
वेळ ती तैसिच तै भोवती ॥
मी जाईन रे ! मी जाईन रे ! उघड जनासी म्हणे ।
शब्द ते वेळि न कोणी गणे ।।
(अंतरा) पाहुनी वेळ शुभ मन रामी रमवुनी ।
माध्यान्ह काळ तो सूर्य दिसे विकसुनी ।
फोडली हाक या, या रे ! या  म्हणउनी ।
राम भजो बे धूप त्यजो हा बोध अंति दाविला ।
प्राण सद्गदित कंठि जाहला ।।१०।।
वाटे की, हे आनंदित निजशब्द दाविले भले ।
पाहु तव दृष्टिपडळ फाकले ।।
नीळ- श्याम नच बिंदू काही ब्रह्मरंध्रि दाटले ।
धन्य ते वैभव मज वाटले ।।
भक्तांचे मेळे मग सारे, सभोवती रांगले ।
नाम उत्साहि गाति तै भले ।।
(अंतरा) धन्य ती वेळ, अजि ! धन्य दास- दासिया ।
सारिखे मुखाने स्मरती गुरुराजया ।
द्वय करे वाजवी  आनंदे  टाळिया ।
जय जय सद्गुरु या नामाने रंग भला ओढला ।
प्राण सद्गदित कंठि जाहला ।।११।।
वृत्तिमधी नच रीघ जरा, सद्वृत्ती सरसावली ।
प्रभा चंद्रासम निज फाकली ।।
सुशोभित ती फुले, दाटणी हारांची जाहली ।
गंजच्या गंज फुले साठली ।।
वाटे जणु या स्थळी, मूर्ति अवताररुपी प्रगटली ।
काय ती शोभा वर्णू भली ? ॥
(अंतरा) धन्य त्या स्थळाचा महिमा,किति गाउ ते ?
तैसीच स्थिती दिनरात तिथे नांदते ।
पाहता पाहणेपणही ना राहते ।
स्तवन किती दिनपणे करावे? वेदहि मौनावला ।
प्राण सदुगदित कंठि जाहला ।।१२।।
सद्गुरुराया! तव महिमा तो, काय वर्णु मी पुरा ? ।
पुरेना कागद हा चिटकुरा ।।
शब्दांनी उपमा द्यायासी, शब्द नुपर जाहले ।
शब्द नि:शब्दी मौनावले ।।
बालक दीन अनाथ, नाथ तू, काढि भवा-आंतुनी ।
पाज तू प्रियचरणा धूवुनी ।।
(अंतरा) आसरा तुझा हा घेउनि निज -स्वामिया !
अर्पिला देह हा, लावि तूचि कामि या ।
मजकडे नसे हे कर्ति- अकर्ती मया ।
तुकड्यादासा ठाव सदा दे, अपुले चरणी भला ।
प्राण सद्गदित कंठि जाहला ।।१३।।