सद्गुरुनाथ गजानन ध्याता, हरपे मन-कामना
(चालः धन्य-धन्य गे स्फूर्ति तन्मये..)
सद्गुरुनाथ गजानन ध्याता, हरपे मन-कामना ।
अनुभवे कळती सकळा जना ।।धृ0।।
निसंग वृत्ती, प्रबळ प्रदीप्ती, रंग सावळा भला ।
नाथ शेगावि प्रगट जाहला ।।
किती सांगू गुण-सद्गुण त्याचे, न कळे कळणी भला ।
स्मरण हे करिता तारिल मला ।।
अपार कीर्ती जगी जयाची, चमत्कार निर्मिडे ।
अनुभव येती पुढच्या पुढे ।।
(अंतरा) राहती नग्र निर्भयचि वरी पाहता ।
करि चिलिम कामक्रोध ही दिसे तत्वता ।
वरि ज्वाल आत्मज्योत ही चमकते सदा ।
पंच विषय हा गांजा ओढित, राहि ब्रह्म-भूवना ।
अनुभवे कळती सकळा जना ।।१।।
आठवता ते नाम तयाचे, संशय सारा पळे ।
चित्त अंतरंग - वळणी वळे ॥
निराधार राहणी जयाची, ऊर्ध्व दृष्टि आढळे ।
नखशिखी आत्मरंग झळझळे ।।
आत्मज्ञानी खरे सद्गुरु,अंतर - वृत्तहि कळे ।
ओळखी घेती जन वीरळे ।।
(अंतरा) नच कधी कार्य साधता पाहिले कुणी ।
नच कधी बहीरंगता पाहिले कुणी ।
नच कधी कुणा बोलता पाहिले कुणी ।
लहर प्रसंगी शब्द काढता अमोल वाटे मना ।
अनुभवे कळती सकळा जना ।।२।।
मानपान नच काहि ठेविला, राही विरळेपणी ।
विरक्ती वाढे सकला जनी ।।
उंच वक्ष स्थल कोमल, तनुही सुंदर मणी भावली ।
रुप ते आवडे सकळा जनी ॥
सिध्द बोलणे कधी चुकेना, अक्षयवेदी धुनी ।
न मागे हाति छदामी कणी ॥
(अंतरा) दर्शना लोक-दाटणी आली पाहता ।
सद्वृत्ति अधिक पाहुनी चढे स्नेहता ।
दे प्रसाद, होई धन्य जगी राहता ।
विरळ्यावरि करि कृपाहि, तुकड्या म्हणे देइ़ सद्गुणा ।
अनुभवे कळती सकळा जना ॥३॥