हो हुशार अजुनी तरी
(चालः हे नरा ! आत बघ जरा..)
हो हुशार अजुनी तरी, पाप हे शिरी, कोठवर घेशी ? ।
बा ! ज्ञान-दृष्टि उजळुनी, पाहि अविनाशी ।।धृ०।।
तुज प्रभाव असुनी पुरा, भटकला नरा! माया कारण
रे ! कर सत्कर्में शुध्द व्हावया मन ।।
का डोल असा मिरविशी ? पालथा होशी, यम-राज्यात
तुज कळले नाही कसे तयाचे मत ? ।
ही सोड अता कल्पना, उन्मतपणा, लागशिल फाशी
बा ! ज्ञान-दृष्टि उजळुनी 0॥१।।
रे ! काळ बहू दुर्धर, ओढि फरफर, समज धर काही ।
तुज नर्क -कुंडि मग सोडतील लवलाही ।।
मारिशी कुणाला हाक ? करुनिया शोक, ऐकतो कोण ?
रगडती तुला रे बहुत सख्या ! दारून ।।
बोलणे तुला बिनतोड, काढि हा फोड, संशया फेकी ।
मग होशी निर्भय चित्ति न हो रे ! शोकी ।।
हो अजर-अमर अमृते, पिऊनी, तू ते, मस्त मग होशी
बा ! ज्ञान-दृष्टि उजळुनी 0।।२।।
फिर्याद नेइ गुरुकडे, काढि साकडे, तुझ्या वरुनिया।
तातडी करी ! धरी धरी गुरु-पाया ।।
त्याविना नसे बा ! सोय, कवण उपाय, सांगतिल तुजला ?
जरि महाकाळ तो असेल उलटा केला ।।
ही क्षणीक दगदग नको, कृपेने धको, भार गुरुध्याने ।
बहु वेडा झाला चिंतातुर मायेने ।।
तो बालक तुकड्या म्हणे, तुम्ही शाहणे, त्यजा मायेसी ।
बा ! ज्ञान-दृष्टि उजळुनी 0।।३।।