हे पहा शब्दभांडार, कलेचा गोठा
(चाल : कशी फिरलि हरीची..)
हे पहा शब्दभांडार, कलेचा गोठा ।
तो संत नव्हे रे ! जगात झोल्या मोठा ।।धृ०।।
बडबडे, दाखवी जनात जाणिव थोरी ।
जाहला कि पैशासाठी रे ! कुविचारी ।।
दावित सोहळा, फिरे जगामाझारी ।
सांगतो ज्ञानवैभवा, नटाची थोरी ।।१।।
मिळवुनी शिष्य चाट्यास, घरोघर फेरी ।
पैसाचि मागतो भीक अनाधिकारी ।।
नच मनात ईश्वर-सखा कधी संचारी ।
तो का होईल भवपार दुजाला तारी ?।।
नाकाचा शेंडा धरुनि पडे परिवारी ।
आसनी गुप्तविषयास भोगि साचारी ।।२।।
वासनी गुंग, भक्तीचा गहिवर भारी ।
त्या ताल-सुराला धरुनि ओरड्या मारी ॥
भोजनास ताटाखाली पाट चौफेरी ।
पायात खडाऊ बुट्टेदार जरतारी ।।
हातात चिलिम गांजाचि घेउनी भारी ।
चौघात बसे जणु बगळा मासे मारी ।।३॥
गांडिला लंगोटी काचा वरच्या वरी ।
मिष्टान्न भक्षितो घरात नानापरी ।।
धर्माची सोडुनि कास भ्रष्ट वावरी ।
अद्वैत- ब्रह्म तो सांगे लोका परी ।।
वासना रांड ती पोसुनि आपुले घरी ।
तिजविणा राहिना दूर कधी क्षणभरी ।।४।।
ही नव्हे नव्हे रे ! निंदा समज अंतरी ।
संतांचे बोललो बोध मुखे निर्धारी ।।
तो सांगे तुकड्यादास अंगि ज्या ताठा ।
तो संत नव्हे रे ! जगात झोल्या मोठा ।।५॥