आपत्ती पासुनी काढि गे ! माय विठाबाई !

(चाल: पतीत पावन नाम...)
आपत्ती पासुनी काढि गे ! माय विठाबाई !
जाइल वाया ही नरकाया, वेळ बरी नाही ।।धृ०।।
बाळपणापासुनी व्यर्थ ही, तनु गेली वाया । 
कोठवरी दुःखाचे डोंगर, सोसू शरिरी या ? ।।१।। 
हे माझे ते माझे म्हणता, नच निवती डोळे ।
विषयसुखाच्या गरळी माते ! रात-दिवस खेळे ॥२॥
सुख नाही क्षण-मात्र जिवाला, गति श्वानावाणी ।
पोटाच्या कारणे धडपडी, सूकरवत जाणी ।।३।।
भले पसरले अघोर वन हे, पडलो त्या माजी ।
काम-क्रोध- मद- मत्सर श्वापद, शरिरांतरि गांजी ॥४॥
ऐसी ऐकिली मात दयाळे ! तूचि दया करिशी ।
भक्तकामकल्पद्रुम जाणुनि, आलो  तुजपाशी ।।५।।
तुकड्याला दे ठाव, पार कर नाव अभाग्याची ।
ना तरी गेले ब्रिद हे  वाया, तुला  लाज   याची ।।६।।