कधी भेटशिल माय दयाळे

(चाल : पतीत पावन नाम...)
कधी भेटशिल माय दयाळे ! दीन अभाग्यासी ?
बहू त्रासलो मन आवरता, ने अपुल्या पाशी ॥धृ०।।
बर्हिसंग हा भोवति पाहता, भय वाटे भारी ।
धीर न धरवे पहाडी राहता, चोरांची  नगरी ।।१।। 
भयाभीत होउनी, नेत्र धावती तुझ्या पायी ।
या षड् रिपुचा मेळा पाहता, घाबरलो आई ! ।|२॥
नाहि योग-साधना समजली, वर नेऊ प्राणा ।
शिकावयाची नुरली इच्छा, सोडुनिया चरणा ।।३।।
भक्त-काम-कल्पद्रुम तू  गे ! करुणा   माते ! ।
तुकड्यादासा प्रेम दावुनी, ने   अपुल्या  पंथे ।।४।।