विरह न साहे सख्या !
(चालः धन्य धन्य गे स्फूर्तितन्मये...)
विरह न साहे सख्या ! तुझा हा, भेट एकदा तरी ।
पाहु दे मूर्ति स्वरुप गोजिरी ॥धृ०।।
व्याकुळ हे जिव-प्राण आमुचे, घ्याया तव दर्शना ।
येउ दे दया जरा तरि मना ।।
अगम्य महिमा तुझी वर्णिली, पूर्ण करी कामना ।
भेट रे ! भेट पतितपावना ! ॥
(अंतरा) फेक हा मोहमायापट जडभूमिचा ।
मालवी घनांध:कार भेद - उर्मिचा ।
झळकवी दिवा झळझळीत ज्ञानाग्निचा ।
जीवभाव हा निरसुनि माझा, अंतःकरण मंदिरी ।
पाहु दे मूर्ति स्वरुप - गोजिरी ।।१।।
सप्तचक्ररत्नांकित ज्याच्या, भ्रमती दारावरी ।
वायु अजपाजप अक्षय करी ।।
वृत्ति-अंकुरी ज्ञानवृक्ष हा खुलवुनि पल्लव-फुला ।
तुझ्या दर्शना धाव घे भला ॥
(अंतरा) नच वेळ करी तू हरी ! भेट एकदा ।
ना कधी तुला मग विसरिन मी सर्वदा ।
इच्छा पुरविच ही, दावि आपुल्या पदा ।
तुकड्यादासा तुरजविण हे जग, फोल दिसे भूवरी ।
पाहु दे मूर्ति स्वरुप - गोजिरी ॥२।।