हरिभजनाची रुची जयाच्या
(चालः धन्य धन्य गे स्फूर्ति...)
हरिभजनाची रुची जयाच्या हृदय- कमलि लागली
तयाची प्रपंच - रुचि फाकली ॥धृ०।।
अभ्यासाने वाढत वाढत अंतरंगि पोहोचली ।
नशा अलमस्त उरी दाटली ॥
काय करावे, काय त्यजावे, बुद्धी हे विसरली ।
फकीरी शरिरावर धावली ॥
(अंतरा) बेतुफान लाटा चढती नयनावरी ।
कुणि द्या अंजनही ना उतरे बाहिरी ।
करि गुंग धुंद, डुलविते शरीरा पुरी ।
मन-वृत्ती ही वेडिच झाली, हरिच्या पदि लागली ।
तयाची प्रपंच - रुचि फाकली ।।१॥
इंद्रिय-वृत्ती भोगावाचुनि, तृप्त होत चालल्या ।
प्रवाही वाहति सुखाच्या खुल्या ॥
असो नसो कपडा अंगावरि चिंध्या अति शोभल्या ।
जरीला लाजविती चांगुल्या ।।
बिन कवडीची कंबर कैसी उदात्तशी शोभली ।
अधिक श्रीमंतीहुनि वाढली ॥
(अंतरा) नच बास घरी पण बादशाहि भेटली ।
चौखूट जहागिरि विश्वाची लाधली ।
प्रतिबंध-बंधने सगळी झाली खुली ।
स्वतंत्रतेची गढी मिळाली, अमरबुटी लाधली ।
तयाची प्रपंच - रुचि फाकली ॥२॥
शास्त्र- पुराणे- वेदादिक हे, सूत्र बोलू लागले ।
वाचल्यावीण उभे जाहले ।।
सृष्टि सुखाची सुंदर शोभा त्या भवती शोभली ।
जनांची जीव वेलि गुंफली ।।
अखिल जनाची मोहिनि माया खूष तयावर भली ।
मागण्या आज्ञा उभि जाहली ।।
(अंतरा) ही अमरबुटी पावली हरी बोलता ।
विसरली भेदवृत्ती विषयांची लता ।
किति गोड वाटते अनुभव हा पाहता ।
तुकड्यादास म्हणे जिववृत्ती शिवरुप पावली ।
तयाची प्रपंच - रुचि फाकली ॥३॥