चल ऊठ हरी ! तव झोप द्वाड ही

(चाल : उठ जागा हो, कां निजला रे...)
चल ऊठ हरी ! तव झोप द्वाड ही आम्हा ! करु ना दे कामाधामा ॥धृ०॥
तू निजला रे ! नीजरूप घेवोनी, टेकती असूर निशानी ।
कुणि कोणा ना पुसती अभिमानी, निति सोडलि ज्यांनी त्यांनी ।
ऋषि गोंधळले मठी मंदिरी रानी, त्रासले कामदेवानी ।
(अंतरा) मातामरि सुटल्या गावा ।
खंडोबा     भैरवबावा ।
कॉलरा    प्लेग वाघावा ।
उघडा हे हरी ! नेत्र जरा घनश्यामा ! करु ना दे कामा धामा ।।१॥
बघ लोकांची दैना ही अति भारी,अन्नान्नि मरति नरनारी।
दुःखद विघ्ने कोसळताती सारी, जनता ही जर्जर भारी ।
बहू चोरांची दाटी, डाके मारी, नाटके तमाशे द्वारी ।
(अंतरा) पेटती अग्निच्या ज्वाला ।
धरणिकंप होतो भू- ला ।
अति पूर नदी-नाल्याला ।
पहा पहा जरा मधूसुदन विश्रामा ! करु ना दे कामा धामा ।।२।।
तव गोधन रे ! असुरांनी कापावे, तुज नेत्रि कसे हे बघवे ?
तव भारत-भू पारतंत्र्य गाठावे, शोभते कसे हे बरवे ?
तव सृष्टीने मर्यादे सोडावे, तू स्वस्थचि झोपी जावे ।
(अंतरा) निंदक भक्ता छळताती ।
कोणि ना कुणाला पुसती ।
ऋतु काळवेळ ना  बघती ।
ना सोसवते दुःख सख्या घनश्यामा ! करु ना दे कामा धामा ।।३।।
करि पावन रे ! जीव दशे हे पडले, पाहण्या तुला जे अडले ।
रुप दाखिव रे ! ध्यान जयांचे नडले, तव प्रेम अंतरी जडले ।
योगींद्र मुनी सनकादिक हे आले, दर्शनार्थ उत्सुक झाले ।
(अंतरा) चल ऊठ येइ सामोरी ।
मिटवि या तमाची   थोरी ।
सुखवि ह्या भक्त नरनारी ।
दे तुकड्याला तव पूद-पकज-प्रेमा, करु ना दे कामा धामा ।।४।।