असुरासी मानवबाणा, पुरवील आस ही कोणा
(चालः ऊठ दे झुगारुनी बेडी...)
असुरासी मानवबाणा, पुरवील आस ही कोणा ! वाटते ? ।।
ज्या दया-मया मुळि काही, उपजली जराशी नाही । क्षणभरी ।।
इतिहास मागचा ऐसा, वाचुनी पहा थोडासा । बंधुनो ! ॥
(अंतरा)जे दुष्ट, मनोच भ्रष्ट, राहती स्पष्ट ।
दया ना त्याना, दया ना त्याना ।
सोडतील कैचे प्राणा, आपुल्या ? ।।१।।
मानवी बुद्धिचे पाश, होतील क्षणि तरि नाश । खात्रिने ।।
होईल त्रास थोडासा, परि दयाद्द्रता गुण साचा । मानवी ।।
क्रोधे जरि मनि जळजळला, तरि सारासारे वळला । शूर तो ।।
(अंतरा) परि क्रूर, न होई दूर, त्रास दे फार ।
नाना, गांजिती गांजिती नाना ।
पाहती लवविण्या माना, आमुच्या ।।२।।
भस्मासुर जव बल दावी, तव युक्ति प्रभुस शोधावी । लागली ।।
घाबरले शंकर भोळे, पळती त्या रानोमाळे । पाहूनी ॥
मदमत्त हत्तिसम झाला, मरणास्तव बुध्दि त्याला । फावली ।।
(अंतरा) विष्णुनी, वेष घेउनी, बनुनी मोहिनी ।
गर्वि असुरांना गर्वि असुरांना
जाळिले त्याचि हातांना, लावुनी ॥३॥
हा आजवरीचा खेळ, मग मिळेल कैचा मेळ । आमुचा ?।।
यासाठी एकचि आहे, सुचतो मज तो सदुपाय । अंतरी ।
दैवि-शक्ति प्रगट करावी, अभ्यासे हृदयी ल्यावी । आपुल्या ॥
(अंतरा) मग राम, पुरवि हे काम, देइ आराम ।
भक्त लोकांना,भक्त लोकांना ।
मानवा मिळे जिवदाना, निश्चये ।।४।।
धर्माची इभ्रत जावी, मंदिरे स्मशाने व्हावी। पाहता ।।
अबलासि क्रूर भेटावे, सति-सेव दुजाकरि जावे । पाहता ।।
गाईचे रक्त वघळावे, नेत्रांनी आम्हि बघावे । पाहता ।।
(अंतरा) हे कसे, शोभते असे ? दुःख मरणसे ।
दया हो प्राणा, दया हो प्राणा ।
का दया तुम्हा यावी ना,बंधुनो ! ॥५॥
या उठा उठा सगळेची, आळवा प्रभू-हृदयासी। गर्जुनी ।
तो सखा आमुचा आहे, संकष्टी भक्ता राहे । रक्षुनी ।।
धावुनि ये ब्रिद हे त्याचे,पाहिजे आर्त जीवाचे । सर्वही ।।
(अंतरा) मग चक्र,धरी करि शक्र, चिरोनी नक्र ।
पाडि असुरांना, पाडि असुरांना ।
हा त्या देवाचा बाण, सर्वथा ।।६।।
चाहुल द्या लागू कानी, सांगू त्या प्रभूषि कहाणी । आपुली ॥
अपराधाविण मनुजांना, मारणे शास्त्र हे कोणा । सांगते ?॥
आपुले हक्क मिळवावे, न्याये हे कथिले देवे । अजवरी।।
(अंतरा) मग पाश,कसा आम्हास,बनवितो दास ।
प्रभू असतांना, प्रभू असतांना ?
तुकड्याची वार्ता कानी, घ्या जरा ॥७।।