व्हा पवित्र अपुल्या देही

(चाल: ऊठ दे झुगारुनि बेडी...)
व्हा पवित्र अपुल्या देही,
याविणा मार्ग कुणि नाही । शांतिचा ॥धृ०।।
आचरा तसेची लोकी, होउनी मनी निःशंकी । सर्वही 
स्वच्छता घराची ठेवा, शेजार तसाची करवा । आपुला॥
कैचणे उकिरडे काढा, मळ होइल हृदयी, गाढा । त्यासवे ॥
जा दिशेस दुर गावाच्या, ना बसा जवळ कोणाच्या । खंडरी ॥
(अंतरा) आपुल्या परीच लोक हे, समजणूक हे,
धरूनि रहा हि, धरूनि रहा ही ।। याविणा०॥१॥
पावित्र्य आचरे अंगी, तो भक्त म्हणा सत् संगी । रंगला ।।
तो थोर म्हणा वृत्तीचा, पावित्र्यचि आश्रम ज्याचा । वर्तनी ॥
स्वच्छ खादि अंगी घाली, हाताने कष्टुनि केली । जाणुनी ।।
गायिसी मनोभावाने, पाळितो स्वतः अंगाने । लक्षूनी ।।
(अंतरा) घरि सडा, पडे धडधडा, बनुनि निर्भिडा,
झाडि मार्गाहि  झाडि मार्गाही,
मज गमे मिळत स्वर्गाही, त्यागुणे ।।२।।
पावित्र्य रुप देवाचे, पावित्र्य अंग दासाचे । सर्वथा ।।
तुळसी वृंदावन दारी, भरि रांगोळी जरतारी । चमकती॥
घर आजुबाजुनी साफ, ना जरा काटि अणि कुंप । सडविले।।
अरुणोदय होण्यापूर्वी, कामे आटोपी सर्वी । आपुली। 
(अंतरा) धन्य तो, घरधनी भला, दिसतसे मला,
मनी ममताहि, मनी ममताहि,
ज्या मत्सर तिळही नाही, अंतरी ।।३॥
बघताच पहाटे कोणी, आटपली स्नाने ज्यांनी । आपुली ॥
गीतापाठासी बसला, घालितो नमन सूर्याला । दंडसे
घरि पुत्र-पौत्र सर्वांना, शिकवीत आपुला बाणा । बोधुनी ॥
अहो ! करा आचरा ऐसे, तरि भक्त बना देवाचे । निश्चये ॥
(अंतरा) ना तरी, बोलणे परी, न घरि आचारी,
थोर तो नाहि, थोर तो नाही,
ज्या शुध्द भावना काही, ना वसे ।।४॥
तुकड्याची ऐका वार्ता, हा प्रसंग कानी पडता । आचरा ।।
आचरा दुसय्रा सांगा, सकळ गावि ऐसे वागा । बापहो !।
तरि वाट मिळे शांतीची, खुंटेल रीत भ्रांतीची । यामुळे ।।
घ्या कर्म आपुले हाता, व्हा तयार गावाकरिता । आपुल्या ॥
(अंतरा) सांगुनी, सतत वर्तुनी, प्रेम देउनी,
बना हो ! ग्वाहि, बना हो ! ग्वाही,
तरि देव सुखाला दई, आमुच्या ।।५।।