श्रीगुरुराज धरि हृदयी, भय हरेल या संसाराचे

(चाल: हरि भगवान कुंजवनी...)
श्रीगुरुराज धरि हृदयी, भय हरेल या संसाराचे ॥धृ०॥
भ्रम-बाजारी जीव धडपडे, काहि कळेना मार्ग तया ।
सत् -संगतिचा लाभ मिळे जव, होइ ज्ञान उध्दाराचे ॥१॥
कठिण प्रसंगचि ओढवती तव,वाढत चिंतारोग सदा ।
जाने होय जव श्रीगुरु-बोधे, पाश जळति कुविचारांचे ॥२॥
अन्य नसे कुणि मार्ग जगी या, मोक्षपदाला जायासी ।
संतुसंगतिने कळते, वळते, पट उघडति हरि-द्वाराचे ॥३ ॥
तुकड्यादास म्हणे निर्भय हो, जाउनिया गुरु-चरणाशी ।
ओळख मी तो कोण, कोठचा ? मार्ग कळति सुविचारांचे ॥४॥