वाढवू नका ही वृत्ती, मी कर्ता अथवा भोक्ता
(चाल: राजहंस माझा निजला.....)
वाढवू नका ही वृत्ती, मी कर्ता अथवा भोक्ता ।।धृ०।।
सर्व हे कार्य देवाचे, सर्वस्वी त्याची सत्ता ।
मो केले काहिच नोहे, सर्व हा हरी करवीता ।
(अंतरा) हा अनुभव सकळा ठायी ।
येतसे पदोपदि पाही ।
जीव हा आमुचा ग्वाही ।
मग व्यर्थ कशाची चिता, वाहता आपुल्या माथा ? ||१।।
आलिया प्रसंगे व्हावे, सावधान कार्यासाठी ।
भिउ नये कुणा तिळमात्र, इच्छितो हेचि जगजेठी ।
नीति-न्याय-बुद्धी अपुली, लावावी कार्यापाठी ।
(अंतरा) अन्याय न पहावा डोळा ।
गमवूच नये ती वेळा ।
फिरु नये भिऊनी काळा ।
हेचि ज्ञान देते गीता, अणि धर्मही सांगे चित्ता ॥२।।
जव अधर्म झाला लोकी, कोणी न कुणाला मानी ।
साधु संत छळले गेले, अन्याय नसोनी कोणी ।
कंसाच्या सत्तेखाली, पापांच्या झाल्या गोणी ।
(अंतरा) ना धर्म राहिला लोकी ।
साधूजन पडले धाकी ।
राक्षसी वृत्तिच्या हाकी ।
गडबडली सारी जनता, नच उरला वाटे त्राता ।।३॥
ऐकताच प्रभुने वार्ता, दुःख हे न बघवे त्यासी ।
भक्तांचा छळ पहावेना, ब्रीदाची लाज तयासी ।
ना चैन पडे क्षण एक, गडबडले वैकुंठासी ।
(अंतरा) गरुडास सोडुनी आले ।
वैकुंठ दुरावुनि ठेले ।
देह - भाव विसरुनि गेले ।
देवकिच्या उदरा येता, जाहला जगाचा त्राता ।।४॥
लीलेने गोपाळासी पुरविले प्रेम देवाने ।
प्रेमाची करुनी मोहनी, पाडिली गोपिंना त्याने ।
होते जे कई अवतारी, फेडाया आला उसणे ।
(अंतरा) मर्दुनी असुर प्राण्यांना ।
भुलविला गर्वमय बाणा ।
शिर उचलूच ना दे कोणा ।
दाखवी मालकी त्राता, अमुची या जगती सत्ता ॥५॥
मानवी बुद्धिला धरुनी, खेळला समाजी खेळा ।
शिकविले राजकारण ते, जिव-भावे त्या पांचाळा ।
रणक्षेत्र पुन्हा गाजवले, उठवोनी अग्नि - ज्वाला ।
(अंतरा) श्रीकृष्णाच्या भक्तांनो ! ।
भारती हिंदुवीरांनो ! ।
संतांनो नी लोकांनो ! ।
तुकड्याची ऐका वार्ता, का प्रसंग सोडुनि पळता ?।।६ ।।