राजास जी महाली सौख्ये कुणा मिळाली । ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या

(चालः वाढो सदा यशाला हा हिंद देश)
राजास जी महाली सौख्ये कुणा मिळाली ।
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥धृ०।।
महाली मऊ   बिछाने, कंदील   शामदाने । 
आम्हा जमीन माने, या झोपडीत  माझ्या ।।१॥
भुमीवरी पडावे, ताय्रांकडे पहावे । 
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत  माझ्या ।।२।।
स्वामीत्व तेथ त्याचे, तैसेचि येथ माझे ।
माझा हुकूम गाजे, या   झोपडीत   माझ्या ।।३॥
महालापुढे शिपायी, शस्त्री सुसज्ज  राही । 
दरकार तीहि नाही, या  झोपडीत   माझ्या ।।४।।
जाता तया महाला, मत जाव शब्द  आला ।
भीती न यावयाला, या  झोपडीत   माझ्या ।।५।।
महालात चोर गेले, चोरूनि  द्रव्य  नेले ।
ऐसे कधी न झाले,  या   झोपडीत   माझ्या ॥६॥
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातुनि होति चोऱ्या ।
दारास नाहि   दोय्रा, या   झोपडीत  माझ्या ॥७॥
महाली सुखे कुणा ही ? चिंता सदैव राही ।
झोपेत   रात्र  जाई, या  झोपडीत   माझ्या ।।८।। 
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा ।
कोणावरी न बोझा, या   झोपडीत   माझ्या ।।९॥
चित्तात अन्य रामा, शब्दी उदंड प्रेमा  । 
येती कधी न कामा, या   झोपडीत  माझ्या ।।१०।।
पाहोनि सौख्य माझे, देवेंद्र तोहि लाजे ।
शांती सदा  विराजे, या   झोपडीत   माझ्या ॥११॥
वाडे महाल, राणे, केले  अनंत   ज्याने ।
तो राहतो  सुखाने, या   झोपडीत   माझ्या ।।१२।।
तुकड्या मती स्फुरावी, पायी तुझ्या रमावी ।
मूर्ती तुझी   रहावी, या   झोपडीत   माझ्या ॥१३।।