जगा कशाला या दुनियेवर, भिऊन पळण्यासी ?

(चाल: उठा गड्या! अरुणोदय झाला...)
जगा कशाला या दुनियेवर, भिऊन पळण्यासी ?
हाजी हाजी करुन कुणाची,पोट भाजण्यासी ? ।।धृ०।।
जिकडे तिकडे लाव लगाई, चुगली पर-निंदा ।
कुटील   कारस्थाने   करणे, सदा   हाचि   धंदा ।।१।।
ध्येय जन्मभर एकचि करणे, उदर-भरण भरणे ।
त्यासाठी कुल-धर्म सत्य- अभिमान नष्ट करणे ।।२।।
हेचि सांगतो काय जगाचा मागिल इतिहास ?
तुकड्यादास म्हणे-अंतर्मुख हो,करि तू अभ्यास ।।३।।