अरे ! बोलाना, अन्याय कशास्तव झाला ?

(चालः मनि धीर धरी शोक. )
अरे ! बोलाना, अन्याय कशास्तव झाला ?
ऐकण्यास सेवक आला ॥धृ०॥
ऐकवा अम्हा सत्य कहाणी कानी, ऐकिनात कोणी म्हणुनी ।
भिउ नका असे गुंड-बंड लोकांना, यातना सत्य वदतांनी ।
(अंतरा) बहु दिवस सहन हे केले ।
धन कुलाभिमानही गेले ।
दबुनीच किती जन मेले ।
सात्विकतेचा वालि न कोणी उरला,
हा अनुभव सगळ्या आला ।।१।।
दबुनिही मरा, ओरड का न करावी ? जग - जनार्दना सांगावी ।
या गावकय्रांमिळूनि सभा भरवावी, गरिबांची हाक ऐकावी ।
हे सांगतसे देश-संस्कृती बरवी, पुन:पुन्हा अनुभवा घ्यावी ।
(अंतरा) विसरून अम्ही हे गेलो ।
मानवी वृत्तिला मुकलो ।
गुंडास जाउनी विकलो ।
जे दुसय्राला तेच उद्या आम्हाला
या विसरु नका हो बोला ।।२।।
चुकतात कधी नोकरही सरकारी, जे लुचपतखोर, भिकारी ।
हे अन्यायी गुंड धरोनी हाती, गावात मजा करताती ।
परि गावाचे न चुको सज्जन कोणी, ना करो कधी बैमानी ।
(अंतरा) सत्यास सहारा द्यावा ।
ना आप्त दुजा ओळखावा ।
ईश्वरी   न्याय     समजावा ।
ही वडिलांची चाल गावि चलण्याला,
स्वातंत्र्य असे  जनतेला ।।३॥
प्रिय सेवक हो ! पुकार घ्या गरिबांची, लावण्या व्यवस्था त्यांची ।
घ्या मदतीला जोडहि सरकाराची हृदयवान कर्तारांची ।
गुणि तरूणांची, प्रिय सज्जन लोकांची, सर्व पक्ष-पंथ मतांची ।
(अंतरा)समजावा पाप करणाच्या ।
ऐकरे म्हणावं विचाय्रा !
बस सज्जनतेच्या वाऱ्या ।
ना तरी करा आरंभचि प्रतिकाराला,
समजावुनि सरळ न झाला ।।४।। 
जे गाव करी ते राव करीना कोणी, हा बोल असे का ध्यानी ? ।
कासया हवा सत्ताधीशही कोणी ? समजावू जोवरि आम्ही ।
गावचे असे झगडे सकल मिटवूनी, ग्रामराज्य स्थापू आम्ही ।
(अंतरा) द्या साह्य मंडळा सगळे ।
सोडूनि मनातिल काळे ।
करु आपणची निर्वाळे ।
तुकड्या म्हणे या पुण्य गाव करण्याला,
आवाज क्रांतिचा आला ॥५।।
                        -चिखलदरा, दि. 0६-०६-१९५२