रम बा ! रम सखया ! गुरुराया !

               (चाल : बाळा जो जो रे...)
रम बा ! रम सखया ! गुरुराया ! शुध्द करी मम काया । रम0 ।।धृ0।।
तू रमलास जरी, या देही । भीति न मग मज काही ।
स्वसुखे राहिन मी, उत्साही । निर्भय या भव -डोही । रम0 ।।१।।
मग मज काय उणे, त्रैलोकी? फिरलो जरि नि:शंकी ।
नुरली आसक्ती, या लोकी । या लोकी, परलोकी । रम0 ।।२।।
गड हे विषयांचे, बळ घेती । जिंकुनिया मज जाती ।
न सुचे काहि मना, ने हाती । जाऊ न दे यम- पंथी । रम0 ।।३।।
जप-तप जरी केले, योगांगे । तल्लिन मन ना रंगे ।
करि धर-सोड सदा, मधि भंगे । रंगू दे चिद् रंगे । रम0 ।।४।।
तीर्थाटनि गेलो, बघण्याला । जीव न तिळभर धाला ।
बाटे शोक मना,धिर खचला। शांति न आलि मनाला । रम0।।५।।
तुकड्यादास म्हणे, घे करुणा । दे धरणा मज चरणा ।
न उणा ठेव मना, दूरपणा । जाळी तम अज्ञाना । रम0 ।।६।।