दयेच्या सागरा रामा !
(चाल: अगर हे शौक मिलने का...)
दयेच्या सागरा रामा ! असा का कोपला आजी ?
कुठे पाह तुला नयनी? राखजो लाज ही माझी ।।धृ0।।
कुणी वल्कलही नेसोनी, कुणी रानात बैसोनी ।
पाहती ध्यान लावोनी, तया करिसी दगाबाजी ।।१।।
कुणी अन्नास सोडोनी, कुणी विषयास मोडोनी ।
भटकती नग्न होवोनी,न भुलसी त्याचिये साजी।।२।।
कुणी फल पुष्प वाहोनी, कुणी योगाचिये ध्यानी ।
बरळती बोलके ज्ञानी, तू घेसी हाक प्रेमाची ।।३।।
म्हणे तुकड्या कुठे गेला,जयाचा तो तिथे नेला ।
सुशोभे सद्गुरुवाला, व्यसन हे आड ये नाजी!।।४।।