घे करुणा गा ! घे करुणा
(चाल: जगदीशा जगतू्पाला...)
घे करुणा गा ! घे करुणा, घे करुणा रुक्मिणी-रमणा ।।धृ0।।
प्रल्हादास्तव धावुनि आला, स्तंभी प्रगटुनि गुरगूर वदला |
कश्यपु तो निज हाते वधला, पतिताच्या पावन-श्रमणा ।।१।।
द्रोपदि-संकटि धावुनि आला,वस्र पुरविसी प्रेमे तिजला ।
दुर्योधन-छळ म्हणुनी केला, योगिजनांच्या निजनयना! ।।२।।
ध्रुव अढळ-पदि नेउनि दिधला, अमर-सनद लिहूनी दे त्याला ।
किति वर्णू तव धीरज-लीला ? भयहरणा ! भवजलशमना! ।।३।।
किति वानू गुण अवगुण सारे, दूर्जन मारुनि सुजना तारे ।
मी तो दीन अधम इतुका रे ! तुकड्यादासा घे चरणा ।।४।।