कुणि सांगा हो, कुणि सांगा
(चाल: जगदीशा जगत्पाला.. )
कुणि सांगा हो, कुणि सांगा हो, कुणि सांगा राम कुठे माझा ।।धृ0।।
कोठे जाउनि पाहिन त्याला? जवळी तो की विवरी गेला?
दीन अभाग्या का अंतरला ? पुरविल जिविच्या या काजा ।।१।।
बनवन फिरता टपले डोळे, दुःखित शरिरे झाले सोहळे ।
नेत्र पिसे खळवळले भोळे, पाहण्या सुंदरशा साजा ।।२।।
जन्मापासुनि दु:खित झालो, गृह-धनदारा यातचि भुललो ।
मी मोठा हे म्हणता झुललो, सांडियली शरिरे लाजा ।।३।।
संतकृपे आठव ती झाली, नेत्रा तळमळ धुंदी भरली ।
आस जगाची सगळी हरली, तुकड्या पद-जल ते पाजा ।।४।।