हिंदभूच्या लेकरा ! मुखचंद्र, का सुकला असा ?
(चाल: ठेविले पाऊल दारी...)
हिंदभूच्या लेकरा ! मुखचंद्र, का सुकला असा ?।।धृ०।।
शक्ति ना शरिरी दिसे, ना धैर्य झळके अंतरी ।
अध्थि-पंजर देह हा, अन्नान्नसा दिसतो कसा? ।।१।।
नेत्र दिसती लालसे, रक्ताळले चिंता - धुरे ।
तारुणीच्या मोहपाशे, दाटली दिसते निशा ।।२।।
याद होते का कधी, तुज पूर्वजांची अंतरी ?
बघशि का इतिहास तू? त्या शूर पुरुषांचा ठसा? ।।३।।
धूर॒ कनकाचा निघे, या भारती मृत्तिकेतुनी ।
अन्न ना मिळते अता, झाला धनाचा कोळसा ।।४।।
धर्म कळतो का तुला? अणि देश कळतो का तुला?
पाप तुज बघवे कसे रे ! केशरीच्या पाडसा ! ।।५।।
रक्त कां थिजले तुझे ? परधर्म चढता पाहुनी ?
(चल)ऊठ जागा हो अता,ही सोड विषयांची तृषा ।।६।।
दास तुकड्या सांगतो, रहावे कसे जाते तुला?
मरणे बरे भूमीवरी, परि दास्य ना हो माणसा ।।७।।