अबोला काय धरीसि गिरधारी !

(चाल: पुजारी मोरे मंदिरमो..)
अबोला काय धरिसि गिरिधारी ! बघ तरि कुंजविहारी ! ।।धृ0।।
दीन अम्हावर त्वाचि रुसावे, सांग अम्ही कवणास पुसावे? ।
तव आशेचे भिकारी ।। अबोला0।।१।।
चंद्रवद्न एक वेळ बघू दे, ग्रहण मधातुनि पार निघू दे ।
लागू दे तव तारी ।। अबोला0।।२।।
मोर-मुकुट पीतांबर बरवा,वाजवि अधरी धरुनी पावा।
बंसि किती तव प्यारी ? ।। अबोला0।।३।।
तुकड्यादास म्हणे घे करुणा, दाखवि भय-हरणा बा! चरणा ।
अमुचे दु:ख निवारी ।। अबोला0।।४।।