कोण दिवस येइ कसा, कोण जाणतो ?

(चाल: मंगलमय नाम तुझे..)
कोण दिवस  येइ कसा, कोण जाणतो ? ।।धृ0।।
एक दिवस हत्तिवरी,मिरविति त्या नवऱ्यापरि ।
एक दिवस मिठ-भाकरि, दारि मागतो ।।१।।
एक दिविस वस्त्र जरी, क्रिडताति महालांतरि ।
एक दिवस चिंधि  घरी  नाहि  सांगतो ।।२।।
एक दिवस मान जनी,चवरी डुलतील तनी ।
एक दिवस न पुसे कुणि, सोडि प्राण तो ।।३।।
ऐसा हा विधि-लिखीत, जीवांना त्रास देत ।
तुकड्याची मात  नव्हे, शास्त्र बोध तो ।।४।।