अवकळा अशी का आली, भारता ! तुझ्या देहाला ?

         (चाल : राजहंस माझा निजला...)
अवकळा अशी का आली, भारता ! तुझ्या देहाला ? ।।धृ0।।
किति धनिक तुझे कुल होते,तुज भानचि याचे नव्हते ।
ही विघ्ने कुठुनी आली, भारता ! तुझ्या  देहाला? ।।१।।
तव गोत क्रषींनी भरले, क्षत्रिये द्वार रक्षीले ।
का अघटित चिंता व्याली,भारता ! तुझ्या देहाला?।२।।
अति कलावान तव स्नेही, ज्या पहातचि परके राही ।
भिक्षेचि वेळ  ही  आली, भारता ! तुझ्या  देहाला?।।३।।
या एकचि कारण झाले, तव घरी ऐक्य ना उरले ।
घरभेदी दिवटी व्याली, भारता ! तुझ्या  देहाला? ।।४।।
तुकड्याची भोळी वाणी, घेशिल का थोडी कानी? 
तू दुजा भीक ना  घाली, भारता ! तुझ्या  देहाला?।।५।।