हरीच्या नाम - स्मरणाने, हरीचे तेज ये अंगी

      (चाल : अगर हे ग्यान को पाना...) 
हरीच्या नाम-स्मरणाने, हरीचे तेज ये अंगी ।
मनाची दुष्टता नाशे, रमे मनही हरी - रंगी ।।धृ0।।
मान-अभिमान टाकोनी, कुणी हरिनाम घे वाचे ।
तयासह नाचतो हसतो, हरी करि दास्य नि:संगी ।।१।।
हरीसी जाणुनी कोणी, हरीचे ध्यान धरि चित्ती ।
प्रकाशे तेज हृदयी त्या, लखलखे  ब्रह्म  सत्‌संगी ।।२।।
हरी म्हणता हरी होतो, हरी-रुपि साठुनी जातो ।
तो तुकड्यादास सांगतसे, तयाचे सुख  ना  भंगी ।।३।।