हिआदभूच्या लेकरांनो, स्वस्थ का बसता असे ?
(चाल: ठेविले पाऊल दारी...)
हिंदभूच्या लेकरांनो, स्वस्थ का बसता असे ? ।
भारताचे ग्रहण हे, नेत्री तुम्हा बघवे कसे ।।धृ0।।
मार्ग काढा उन्नतीचा, या पुढे सरसावुनी ।
भेद-भावा सोडुनी, ध्या प्रेम - ऐक्याचे पिसे ।।१।।
जीर्ण ज्या चाली-रिती,डोळे मिटवुनी ना करा ।
वेळ ही पाहोनिया, कर्तव्य शोधा सायसे ।।२।।
आचरा सुविचार-वृत्ती, अनुभवाला घेउनी ।
अंध-श्रध्दा सोडुनी, व्यवहार साधा धाडसे ।।३।।
राहु द्या सत् प्रेम चित्ती, श्रीहरीसी गावया ।
नांदु द्या विजयी ध्वजा,द्या प्राण समरी वीरसे ।।४।।
दास तुकड्या सांगतो, काढा घरातुनी आळस़ा।
काव्य बनवा आपुले, स्वातंत्र्य जै लाभे तसे ।।५।।