हरिनाम हे फुकाचे, जप मानवा ! तु वाचे

(चाल: रसने ! न राघवाच्या...)
हरिनाम हे फुकाचे, जप मानवा ! तु वाचे ।
तुटतील बंध सारे, भव-पाश या जिवाचे ।।धृ0।।
मन लावुनी विचारी, धरि एकनिष्ठ तारी । ॒ 
निष्काम गा मुरारी, अति हर्षे देव नाचे ।।१।।
नच जाइ पुण्यधामा, बस रे ! करीत कामा ।
कामात लक्ष रामा-वरि, ठेव  अंतरीचे  ।।२।।
सोडूनि कल्पना ही निंदा-स्तुती जगाची ।
रंगोनि एकभावे, सुख  घे  हरी - पदाचे ।।३।।
तुकड्या म्हणे ही वेळा, साधूनि घे फुकाची ।
अनमोल जन्म जाता, मग मार त्या  यमाचे ।।४।।