गंगे ! तुझ्या तिराला , मन हे निवांत राही

(चाल : रसने ! न राघवाच्या...)
गंगे ! तुझ्या तिराला, मन हे निवांत राही ।।धृ0।।
किति शांत धार वाहे? पाणी अथांग राहे ।
पापी जलात न्हाये, घे सौख्य तो सदाही ।।१।।
वाद्ये अनंत  वाजे, किति  चौघडे  नगारे ।
बहु भक्त येति भोळे, शोभा अगम्य पाही ।।२।।
पितरास स्वर्गि न्याया, जणु नाव तू तयांची ।
देवोनि अस्थिका ही, जन ठेवतात ग्वाही ।।३।।
योगी-मुनी तिराशी, धरुनी बसे समाधी ।
तुकड्या म्हणे तुझ्या या, तिरि मोक्षची सदाही ।।४।।