अमोल ही वेळा जन्माची , वाया व्यसानी खोवु नको

(चाल: उठा गड्या ! अरुणोदय झाला...)
अमोल ही वेळा जन्माची, वाया व्यसनी खोवु नको ।
ज्या अन्नाने पाप वाढते, नीच अन्न ते सेवु नको ।।धृ0।।
धर्मावरती प्राण द्यावया च्या-च्या म्या-म्या करु नको ।
ऊठ उभा हो करी गर्जना, घराभोवती मरू नको ।।१।।
वडिलोपार्जित हक्क आपुले, गमावुनीया बसु नको ।
कमावण्याची आलि वेळ तरि,घरी चुलीशी धसू नको ।।२।।
स्वतंत्रेचा बैल बरा पण, गुलामगिरिचा थोर नको ।
हक्काचा कोंबडा बरा, पण दुष्मानाचा मोर नको ।।३।।
तुकड्यादास म्हणे घे कानी, वनी वनी तू फिरू नको ।
कर्तव्याच्या घरी मरी, पण दुर्बलतेने जिरू  नको ।।४।।