ज्वानी प्रभुने दिली म्हणोनी , अबला दुःखी करु नको

(चाल: उठा गड्या ! अरुणोदय झाला...
ज्वानी प्रभुने दिली म्हणोनी, अबला दु:खी करू नको ।
जे जे करशिल ते ते भरशिल या वचनाला विसरु नको ।।धृ0।।
अन्न फुकाचे मिळे म्हणोनी, पोट फुगेवर  जेवु  नको ।
अभिमानाच्या भरी येउनी,असूनि उपाशी राह नको ।।१।।
श्रीमंताचा बाळ म्हणोनी, अष्ट प्रहरवरि झोपु नको ।
देवाने दिधला पैसा जरि, व्यभिचाराने फेकु  नक्की ।।२।।
ज्या संगाने दुर्गुण वाढे, संग अशाचा   धरु  नक्को ।
तुकड्यादास म्हणे कीर्तीविण, नरदेही या मरू नको ।।३।।