जगाचा भेद लयाला जावो
(चाल : पुजारी ! मोरे मंदिरमों...)
जगाचा भेद लयाला जावो , शांति अखंडित राहो ।।धृ0 ।।
खळ-निंदक हे निर्मळ होऊनि, द्वेषपणाचा लेश न राहूनि ।
सकळ प्रभू - गुण गावो ।। जगाचा0 ।।१।।
मानव-धर्म मनाते लाभो, निसर्गमय वृत्ती हरी ! शोभो ।
अखिल जगा सुख होवो ।। जगाचा0 ।।२।।
पंथ-मतांतर विलया जावे, तत्त्वज्ञान सर्वांतरि व्हावे ।
देव ही एकचि राहो।। जगाचा0 ।।३।।
तुकड्यादास म्हणे ही आशा, पुरवावी अमुची जगदीशा ! ।
झणि उद्याला येवो।। जगाचा0 ।।४।।