चल ऊठ गडया ! झोप सोड सोड आपुली
(चाल : अब तेरे सिवा कोन..)
चल ऊठ गड्या ! झोप सोड सोड आपुली ।
हे पेटले चहुकडोन, आग लागली ।।धृ0।।
कोणी कुणास मारती खुशी म्हणोनिया ।
कोणी कुणास पळविति अबला गणोनिया ।
पोटास अन्न ना म्हणोनी बाळे मारिली। हे पेटले0।।१।।
कोणी कुणाची भक्ति करी बंद येउनी ।
साधु ऋषी तसेचि मरति ना मिळे कणी ।
ही काय चालली भयाण धुंदता खुली । हे पेटले0।।२।।
हा बाग लाविला कुणी? कुणाची ही मुले ? ।
धरीत चालली फुले नि झाड तोडिले ।
काळोख पसरला नि वीज चमक लागली । हे पेटले0।।३।।
आवाज कुठुनि येत हा कडाकडा वरी? ।
हे वरुनी उडत काय? पाहि पाहि सत्वरी ।
तुकड्या म्हणे प्रभूने काय वेळ आणली ! हे पेटले0 ।।४।।