कोणिकडे पाहता ? ऐकता कि झोपता ?
(चाल: घटा घनघोर घोर...)
कोणिकडे पाहता ? ऐकता कि झोपता ? ।
वेळ कशी घालिता ?।
उठाना, काळ उभा मागुता रे ।।ध0।।
श्रीमंताची घरे चेतली, बलवानांची काया ।
शु॒रांचे हत्यार गळाले, मुकले कइ, मरनाया ।
काय तुम्ही राहता, म्हणोनिया साहता? ।
वेळ कशी घालिता?।
उठाना, काळ उभा मागुता रे ! ।।१।।
घरचे धनी घराचे वैरी, वेळ अशी ही आली ।
अब्रु-इञ्जत गेली सगळी, धूळधाणि ही झाली ।
काय कुणा सांगता ? कोण आहे ऐकता ? ।
वेळ कशी घालिता ? ।
उठाना, काळ उभा मागुता रे ! ।।२।।
जागे व्हा बंधुनो ! उठाना धर्माला रक्षाया ।
तुकड्यादास म्हणे सखयांनो, ब्रीद जातसे वाया ।
मार्ग कसा भूलता ? विचारा विचारता ? ।
वेळ कशी घालिता ? ।
उठाना काळ उभा मागुता रे ! ।।३।।