अमरपुरीची वाट उघडली

( चाल : असार जीवित केवळ माया...)
अमरपुरीची वाट उघडली, या रे या सगळे  जाऊ । 
समुदायाने करूनि प्रार्थना, विश्वचालकासी गाऊ ।।धृ0।।
मानवधर्म श्रेष्ठ सकळाहुनि, त्याची शिकवण मिळे तिथे ।
नीचउच्चता सोडुनि सगळे, बसले दिसती एक मते ।।१।।
सर्व जनांना वाव मिळे, अपुलाले  भाषण  बोलाया ।
सध्दर्माची शिकवण सगळी, मिळे गड्या ! यारे या ।।२।।
माणुसकीचा धडा मिळे, अणि दुर्गुण हे पळती सगळे ।
लाज वाटते  पापवृत्तिला, धर्मभाव  अंगी  उसळे ।।३।।
विश्‍वचालकाच्या कार्याचे, वर्म कळे जाता  बसता ।
रंग लागतो अंतरंगिचा, भजन तिथे गाता ठसता ।।४।।
खोवु नका रे संधी असली, करा प्रार्थना चला चला ।
तुकड्यादास म्हणे या लोकी, हाच मार्ग सकळास भला ।।५।।