अस्तास सूर्य गेला, चल प्रार्थनेस आता
(चाल : या प्रिय भारताचा...)
अस्तास सूर्य गेला, चल प्रार्थनेस आता ।
नियमित वेळ झाला, चल प्रार्थनेस आता ।।धृ0।।
गोपाळ-गायि आल्या, वत्सास पाजण्यासी ।
शांती तशी मनाला, चल प्राथनेस आता ।।१।।
असतील सर्व जमले, उत्साहल्या मनाने ।
सारोनि आळसाला, चल प्रार्थनेस आता ।।२।।
केली असेल तेथे, अति हर्षुनी तयारी ।
सुखवावया जिवाला, चल प्रार्थनेस आता ।।३।।
सांगु प्रभूस अपुल्या, विश्वास सोख्य देई ।
शिस्तीत गाउ त्याला, चल प्रार्थनेस आता ।।४।।
देतील बोध कोणी, मानव्यता कळाया ।
तुकड्या म्हणे जनाला,चल प्रार्थनेस आता।।५।।