समुदाय प्रार्थने ची किती गोड ही प्रणाली
(चाल : या प्रिय भारताचा...)
समुदाय प्रार्थने ची किती गोड ही प्रणाली ।
लाभो जनास सकळा, किती गोड ही प्रणाली ।।धृ0।।
रांगेत बैसवोनी, अति शांतता करोनी ।
गंभीर गाति सारे, किती गोड ही प्रणाली ।।१।।
सर्वास वस्त्र खादी, डोक्यात टोपी भगवी ।
नमताति सर्व मिळुनी, किती गोड ही प्रणाली ।।२।।
सर्वांस वाव येथे, कुणि उचं नीचं नाही ।
अणि पंथ भेद नाही, किती गोड ही प्रणाली ।।३।।
वेळेवरीच यावे, अति संघटोनी जावे ।
तत्वास या बघावे, किती गोड ही प्रणाली ।।४।।
जगतात वाद जे जे, मिटवोनी सर्वही ते ।
माणूसकीस दावी, किति गोड ही प्रणाली ।।५।।
दु:खी कुणी नसावा, पापी कुणी नसावा ।
तुकड्या म्हणे सुखाची,किति गोड ही प्रणाली ।।६।।