रंग लागू दे हृदयास रे, मग होय बुवा लोकात

(चाल. : ऐन दुपारी एकटी..)
रंग लागू दे हृदयास रे, मग होय बुवा लोकात ।।धृ0।।
उगिच कशाला घालशी माळा ।
लावशी  चंदन  भस्म  कपाळा ।
अंतरि भरला   दुर्गुण  सगळा ।
प्रेम भक्तिचा नाही झरा तर, धरितिल जन हे हात रे ! ।। मग0 ।।१।।
बोल कुणाशी  गोजिरवाणा ।
वाग जसा जगतात शहाणा ।
देतिल मग जन हे तुज माना ।
निर्भय हो अन्याय वदाया, राहो मग कुणि तात रे ! ।।मग 0।।२।।
आहे त्यात सदा सुख मानी ।
कर सेवा जनतेची   मनानी ।
दुर्गृण हे  हृदयातुनि   हाणी ।
कधि न करी तू गर्व कशाचा, नम्र राही जगतात रे ! ।। मग0 ।।३।।
काय मिळे   ते खावे   ल्यावे ।
परि हरिचे गुण नित्य वदावे ।
सुख दु:खाना सहन  करावे । 
असत्य लोका दूर करोनी, सत्याची धरि मात रे ! ।। मग0।।४।।
निर्मळ    हो   हृदयापासुनिया ।
भीति नको मरण्याची मनि या ।
कार्य कररि निर्भय   होउनिया ।
तुकड्यादास म्हणे लोकांती, कर नेहमी एकांत रे ! ।। मग0।।५।।