ही शान उंच कपडयाची, जाहली कुच कामाची

(चाल: लागला रंग भजनाचा...)
ही शान उंच कपड्याची, जाहली कूच-कामाची ।।धृ0।।
अंगास सुगंधी असे । अन्‌ पाकिट खाली असे
ना  साथ   मिळे   कोणाची ।।१।।
गावात रिकामा फिरे । अन्‌ शौकासाठी झुरे ।
ना इज्जत घरि बसण्याची ।।२।।
कामाची लाज वाटते । नोकरी म्हणुनि पाहते ।
ती   मिळे  बूट   पुसण्याची ।।३।।
मोटारीस ललचावला । पायीच पेच लागला ।
आली वेळ प्राण देण्याची ।।४।।
अरे ! समज समज अंतरी । शेतीत पिकवि बाजरी ।
घे हाती  पास   वखराची ।।५।।
दुनियाच बदलली अशी । आपणास लाज मग कशी ।
कानी घे हाक तुकड्याची।।६।।