घडी घडी मनी तुझे नाम जपावे
( चाल : सारी सारी रात तेरी याद ...)
घडी घडी मनी तुझे नाम जपावे ।
चित्त स्थिरवोनी चरण पहावे रे !
चरण पहावे ।।धृ0।।
कोणा आवडतो संसार सारा ।
घरदार सारे मोह - पसारा ।।
परी दु:ख वाटे, अंतरी बघावे रे !
अनुभव घ्यावे ।।१।।
सगुण साकार रुप ते निर्मळ ।
ध्यानी ठेविताचि पळे कळिकाळ ।।
संत देती साक्ष ग्रंथासी पहावे रे !
अनुभव घ्यावे ।।२।।
आम्हा साधकासी हाचि मार्ग सोपा ।
जन्म - मरणाच्या चुकवाया खेपा ।।
तुकड्या म्हणे क्षण फुके न गमावेरे !
अनुभव घ्यावे ।।३।।