डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे !

 ( चाल : सारी जवानी में तूने किये...)
डगमग डोले माझी पाण्यावरि नाव रे !
पंढरीच्या पांडुरंगा ! बेगी बेगी धाव रे ! ।।धृ0।।
तुझिया चरणी वाहे  भीमा   चंद्रभागा ।
कसा येऊ सांग देवा ! झालो मी अभागा ।
आता तरी एक वेळा, देवा ! मला पाव रे ! ।
पंढरीच्या 0।।१।।
तूज पाहण्यासी माझा जीव हा भुकेला ।
धीर ना वाटे देवा ! माझिया     मनाला ।
येऊ मी कोण्या रिती ? दूर तुझे गाव रे !
पंढरीच्या 0।।२।।
गोऱ्या कुंभाराची देवा ! ऐकली विनवणी ।
भक्त एकनाथा   घरी, वाहिलेसे    पाणी ।
मज का न मिळे देवा ! तुझ्या पायी ठाव रे?
पंढरीच्या 0।।३।।
प्रल्हादाकारणे कैसा नरसिंह    झाला ।
भक्त तारण्यासी प्रभू ! दुष्ट मारियिला ।
म्हणे दास तुकड्या मजला,रूप तुझे दाव रे ! ।
पंढरीच्या 0।।४।।