तुझ्या स्वरुपाचे लागू दे ध्यान

( चाल : देव बाजारचा भाजीपाला...)
तुझ्या स्वरुपाचे लागू दे ध्यान ।
राहावया चित् त- समाधान ।।धृ0।।
सारा संसार दु:खाची ज्वाला ।
जीव गुंतोनि हा कष्टी झाला ।।
नाही तिळभर शांती मनाला ।
कोण देईल सत्प्रेम दान ?
राहावया चित् त- समाधान ।।१।।
जिकडे पाहावे तिकडे मोहमाया ।
कामक्रोधाने जळते ही काया ।।
नाही कोठेही  शीतल   छाया ।
तुझ्या प्रेमानं मन हो तल्लीन ।।
राहावया  चित्त - समाधान ।।२।।
तुझे नामी अमृताची गोडी ।
यास नाही दुजी कोणी जोडी ।।
म्हणुनि मन हे तुला ना सोडी ।
वाटे  अर्पू    तुला    जीवप्राण ।।
राहावया चित्त - समाधान ।।३।।
सर्व भटकोनी आलो नरदेही ।
लाभ व्हाया तुझा लवलाही ।।
दास तुकड्याची पुरवी इच्छा ही ।
देई     प्रभुराया ! हे   वरदान ।।
राहावया  चित्त - समाधान ।।४।।