घेतो धर्माची आण, मनी नाही ईमान

  ( चाल : मनि नाही भाव म्हणे देवा...)
घेतो धर्माची आण, मनी नाही ईमान ।
धर्म अशानं कळायचा नाही रे !
धर्म पोरांचा पोयखेळ नाही  रे ! ।।धृ0।।
तीर्थक्षेत्री गेले, नाही एवढाच धर्म ।
व्रत-जप केले, नाही एवढाच   धर्म ।।
दानपुण्य चाले, नाही एवढाच धर्म ।
माळा-भस्म-टिळे,नाही एवढाच धर्म ।।
ही तो धर्माची उपांग भाई रे ! ।
धर्म पोरांचा पोरखेळ नाही रे ! 0।।१।।
तत्त्वाचा विचार, तोच खरा धर्म ।
सत्याचा आचार, तोच खरा धर्म ।।
न्यायाचा व्यवहार, तोच खरा धर्म ।
करुणा अन्‌ उपकार, तोच खरा धर्म ।।
वर्म धर्माच समतेत राही रे ! ।
धर्म पोरांचा पोरखेळ नाही रे ! 0।।२।।
माझा धर्म न्याय अन तुझा धर्म न्यारा ।
करी भांडाभांडी हा अधर्मचि सारा ।।
मानवता ठेवा अन्‌ मग चर्चा करा ।
तुकड्या म्हणे जगाची धारणा सुधारा ।।
बोलण्या चालण्यात ताळमेळ पाही रे ! ।
धर्म पोरांचा पोरखेळ नाही रे ! 0।।३।।