जगशील कसा तू सांग गड्या ?

(चाल : जीवनमें पिया तेरा साथ..)
जगशील कसा तू सांग गड्या ?
उद्योगची करणे नाहि तुला?
फिरतोस रिकामा दिवसभरी,
तुज कोण घरी ठेवील मुला ?।।धृ0।।
या तरूणपणी अति आळस हा,
व्यभिचार कराया लावितसे ।
व्यसनाधिन माणुस पाप करी,
मग चोरी कराया जात खुला ।।१।।
जी गुंड उनाड मुले असती,
भुलवोनि तुला फसवीतिल ना?
असलास जरी पदवीधर तू,
तरि लोक कसे म्हणतील भला ? ।।२।।
धनधान्य जरी भरले वडिले,
तरि कोठवरी टिकणार असे?
ही शान तुझी दो दिवसांची !
मग भीकचि मागशि जनतेला ।।३।।
म्हणुनी तुज विनवितसे सखया !
तू एक कला तरि घे पदरी ।
तुकड्या म्हणे नाहितरी जगणे,
हे योग्य नसे   भूवरि   तुजला ।।४।।