अवगुण अपुले अंतरी दिसती

(चाल : मानवा का चिंता वाहती..) 
अवगुण अपुले अंतरी दिसती, करि चिंता त्याची ।
करु नको निंदा कोणाची ।।धृ0।।
सरळ स्वभाव, मृदू भाषा ही, वापर मोलाची ।
सर्वाशी   संमतचि     राही,   श्रध्दा     संतांची ।।१।।
हात वळो उपकार कराया, पाउल तीर्थासी ।
हृदय कराया सहन संकटे,मिळे   प्रभु - प्रेमासी ।।२।।
ज्ञानामृत पाझरते जेथे, हाती धरि त्यासी
तुकड्यादास म्हणे रे साधक ! प्रभु ये त्यापाशी ।।३।।