कुठे थांबू नको रे चाल
(चाल: तू तो दो दिनका मेहमान...)
कुठे थांबू नको रे चाल, सारे सोडुनी दे जंजाल ।
तुझी एकट्याची माळ ! तुझ्या गुरुदेवासी घाल ।।धृ0।।
म्हणतील कोणी वेडा तुजला,जरा न ऐकी त्यांचे ।
सत्कर्माला चिकटोनी राही,उणे न चित् कोणाचे ।
जरी तू झालासी कंगाल ! अपुल्या संकल्पाला पाळ ।
तुझी एकट्याची माळ! 0।।१।।
खोटा धंदा नाही म्हणुनी, छदाम नाही गाठी ।
पैशापासी सर्व राहती, छल - बल - पापे मोठी ।
पापा पाशी राहतो काल! करण्यासाठी जिवाचे हाल ।
तुझी एकट्याची माळ ! 0।।२।।
शान-शौकिनी नाही म्हणुनी, मित्र न जमती कोणी ।
एकटाच मग राहसी पडुनी, उदासलेल्या वाणी ।
घेउनी प्रभू - भक्तिची ढाल, तोडी भवतापाचे ताल ।
तुझी एकट्याची माळ ! 0।।३।।
जिवनाचे काटे उचलोनी, शांति-सुखाने राही ।
आत्म्याचा मग सर्वांभूति, अनुभव तुजला येई ।
तुकड्यादास म्हणे हो लाल, होशिल गुरुदेवाचा बाल ।
तुझी एकट्याची माळ ! 0।।४।।